
लीड्स कसोटीवर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले हिंदुस्थानला बॅकफूटवर ढकलले आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 8 बाद 423 धावा केल्या असून यजमान संघ सध्या 345 धावांनी आघाडीवर आहे. याआधी लॉर्डस कसोटीमध्ये टीम इंडियाने 151 धावांनी विजय मिळवला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र लीड्स कसोटीमध्ये पहिल्या डावात 78 धावांमध्ये शरणागती पत्करल्याने मालिका 1-1 बरोबरीत आणण्याची संधी इंग्लंडच्या संघाकडे आहे.
दुसऱ्या दिवशी काय घडलं?
इंग्लंडने आपला पहिला डाव बिनबाद 120 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक करून खेळपट्टीवर तग धरलेले सलामीवीर रोनी बर्न्स 61 आणि हसीब हमीद 68 धावांवर बाद झाले. यानंतर तब्बल तीन वर्षानंतर संघात पुनरागमन झालेला डेव्हिड मलान आणि कर्णधार ज्यो रूट यांनी किल्ला लढवला. रुटने सलग तिसऱ्या कसोटीत शतक झळकावले, तर मलानने 70 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अखेरच्या सत्रात टीम इंडियाने कमबॅक केले आणि चार बळी झळकावले. सध्या ओव्हर्टन 26 आणि रॉबिन्सन शून्यावर नाबाद आहे.
…तर टीम इंडियाला संधी
पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानच्या संघाला तिसऱ्या दिवशी पहिल्या काही षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन खेळाडूंना बाद करावे लागणार आहे. त्यानंतर सामना वाचवण्यासाठी मैदानात उतरावे लागेल. परंतु क्रिकेट समालोचक मोहम्मद कैफ याने दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात केलेल्या दमदार पुनरागमनामुळे हिंदुस्थानलाही विजयाची संधी असल्याचे म्हटले आहे.
काय आहे नंबर गेम?
इंग्लंडला तिसऱ्या दिवशी झटपट गुंडाळून हिंदुस्थानला दमदार फलंदाजी करावी लागणार आहे. लॉर्डसमध्ये शतक झळकावलेल्या के.एल. राहुलला पुन्हा एकदा शतकी खेळी करावी लागेल. तसेच रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यापैकी दोघांना राहुलला साथ देत मोठे शतक ठोकावे लागेल. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाला इंग्लंडची आघाडी मोडावी लागेल. तसेच पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात फलंदाजी करून इंग्लंडपुढे विजयासाठी 180 ते 200 धावांचे आव्हान ठेवल्यास हिंदुस्थानकडे विजयाची संधी असेल, असे कैफ म्हणाला. मात्र या सर्व जर-तरच्या गोष्टी असून पहिल्या डावातील हिंदुस्थानची कामगिरी पाहता फलंदाज कसा तग धरतील हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
…म्हणून अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी नाही, कर्णधार विराट कोहलीने केला खुलासा
2002 चा तो सामना
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2002 मध्ये झालेला सामना डावाने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानच्या राहुल द्रविडने 148, सचिन तेंडुलकरने 193 आणि सौरव गांगुलीने 128 धावा चोपत संघाला 628 धावांचा डोंगर उभारून दिला होता. यानंतर अनिल कुंबळे आणि झहीर खानच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा पहिला डाव 273 आणि दुसरा डाव 309 धावांमध्ये गुंडाळत एक डाव आमि 46 धावांनी विजय मिळवला होता. या कसोटीत द्रविड, तेंडुलकर आणि गांगुलीने पहिल्या डावात जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पुन्हा केल्यास सामना अनिर्णित राखता येऊ शकतो किंवा कैफ म्हणतो तशी विजयाची संधीही निर्माण होऊ शकते.
INDvENG ‘गर्व खिशात ठेव आणि…’ सतत ‘फ्लॉप’ होणाऱ्या कोहलीवर दिग्गजाने साधला निशाणा




























































