
लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांत हिंदुस्थानची मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, हेच पराभवाचे सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आलेय. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर आपल्या फलंदाजीवर अधिक फोकस करायला हवे, असा सल्ला माजी महान फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने देताना, ऋषभ पंतने इंग्लंडच्या सामान्य आक्रमणाविरुद्ध शतकी खेळीला द्विशतकात रूपांतरीत करावे, अशी ऍश की बात केलीय. अश्विनचा सल्ला पंत किती गांभिर्याने घेतोय ते एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर दिसेलच.
अश्विनने आपल्या ‘ऍश की बात’ या यूटय़ूब चॅनलवर हिंदुस्थानच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण केलेय. यात त्याने संघाला फलंदाजीवर अधिक लक्ष द्यायला हवे, जेणेकरून ते धावांच्या हिशेबानुसार प्रत्येक डावात आपल्या फलंदाजीचा वेळ वाढवू शकतात. पराभव झालाय म्हणून घाबरू नका आणि संघात अधिक बदलही करू नका. जे लीड्सला जमले नाही ते एजबॅस्टनला करू शकता. मालिकेत बरोबरी साधू शकता; पण जर आपण इंग्लंडच्या रणनीतीला समजू शकत नाही तर मालिका लवकरच आपल्यापासून दूर जाईल.
चौथ्या दिवशी ज्या पद्धतीने आपली फलंदाजी कोलमडली, तिथेच आपण लढाई हरलो. आपण पाचव्या दिवसांपर्यंत फलंदाजी करू शकलो नाही, इथेच सामना संपला. दुसरीकडे इंग्लंडने खुलेआम प्रचार केलाच होता की लक्ष्य कितीही असो, आम्ही त्याचा पाठलाग करणारच. यासाठी आम्हाला फलंदाजीच्या क्रमावर थोडं अधिक लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आपल्याला त्यांना कमी वेळ आणि अधिक लक्ष्य देता येईल, असेही अश्विन म्हणाला.
पंत हा कोहलीसारखाच…
पंतने दोन्ही डावांत शतके ठोकली म्हणून त्याची धोनीशी तुलना करणे योग्य नाही. कारण धोनीने कधीच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. पंतची तुलना विराट कोहलीशी करायला हवी. तो एक मुख्य फलंदाज आहे आणि त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. चेंडूंची निवड करून फटकेबाजी करण्याचा पंतचा खेळ पाकिस्तानच्या महान फलंदाज इंझमाम उल हकसारखा आहे. काही फलंदाजांना योग्य चेंडू निवडून त्याला ठोकण्याची कला असते. पंतही गोलंदाजाच्या लाईन लेंग्थला लवकर ओळखतो आणि आपल्या पोझिशनमध्ये येतो. पंत हा त्या दुर्लभ खेळाडूंपैकी एक आहे. पंतची दोन्ही डावांतील शतकी खेळीही दुर्लभ आहे. त्याने आपल्या खेळाला आता अधिक पुढे न्यायला हवे. त्याने थोडेसे बचावात्मकही खेळायला हवे. क्रिकेटच्या पुस्तकात असा कोणताही शॉट नाही, जो पंत खेळू शकत नाही. त्यामुळे पंतला माझे आवाहन आहे की, त्याने पुढच्या वेळी 130 धावांवर खेळत असशील तर त्याला द्विशतकी मान दे.





























































