
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाने इतिहाच रचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा ICC टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या 256 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ 159 धावांमध्ये गारद झाला आणि हिंदुस्थानने 96 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकप उंचावला.
न्यूझीलंडकडून टीम साईफर्ट (52) आणि कर्णधार मिचेल सेंटनर (43) वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. हिंदुस्थान कडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल याने 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येक एक विकेट मिळाली. 4 षटकात 15 धावा देऊन 4 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराह याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर सलग तीन करो या मरो लढतीत अर्धशतक ठोकणाऱ्या संजू सॅमसन यांना प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आहेत. 20 षटकांत टीम इंडियाने 255 धावसंख्या उभारली. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वोच्च स्कोअर ठरला आहे.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची वादळी खेळी
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हिंदुस्थानी संघाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक केवळ 18 चेंडूत ठोकले. त्याने 52 धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने मैदानात पाय रोवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. सॅमसनने अवघ्या 46 चेंडूत 89 धावांची विक्रमी खेळी साकारली. टी-20 विश्वचषकाच्या फायनलमधील आतापर्यंतची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
इशान किशनचा अर्धशतकी तडाखा
सलामीवीर बाद झाल्यानंतर इशान किशननेही आक्रमक पवित्रा कायम राखला. त्याने 24 चेंडूत 54 धावा कुटल्या. टीम इंडियाने 15 षटकांतच 200 धावांचा टप्पा ओलांडला होता आणि एका वेळी संघ 300 धावांच्या जवळ जाईल असे वाटत होते.
मात्र न्यूझीलंडच्या जिमी नीशमने एकाच षटकात संजू सॅमसन, इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (0) या तिघांना बाद करून हिंदुस्थानच्या धावगतीला ब्रेक लावला. नीशमने 32 धावांत 3 बळी घेतले. शेवटच्या षटकांमध्ये तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी संघाची धावसंख्या 255 पर्यंत नेली.




























































