INDvsNZ Test – दुसऱ्या लढतीपूर्वी विराटच्या चिंता वाढल्या, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत

1992

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील दुसरा कसोटी सामना 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात 10 विकेट्सणे दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. मालिकेत 1-0 पिछाडीवर असणाऱ्या विराटसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. मात्र या लढतीपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला असून यामुळे विराटच्या चिंता वाढल्या आहेत. टीम इंडियाचा एक महत्त्वाचा खेळाडू सरावादरम्यान जायबंदी झाला आहे.

वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली होती. अति सावध खेळ करण्याच्या नादात फलंदाजांना धावाही जमवता आल्या नाही आणि विकेट्सही वाचवता आल्या नाहीत. त्यामुळे विराटने देखील फलंदाजांना डिफेन्स सोडून आक्रमक होण्याचा सल्ला दिला. पहिल्या कसोटीत दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉ यालाही चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु आता त्याला सरावादरम्यान दुखापत झाल्याने दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी शुभमन गिल याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

पृथ्वीच्या पायाला सूज
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान पृथ्वी शॉ याच्या पायाला सूज आली आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असून पायाच्या दुखापतीमुळे बुधवारी तो सरावही करू शकला नाही. जर पृथ्वी शॉ याच्या तपासणीचा अहवाल गंभीर आला तर त्याला दुसऱ्या लढतीत आराम देण्यात येईल. त्यामुळे गिलला संधी मिळू शकते.

गीलला मिळू शकते संधी
दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे आहे. जेथे गेल्या महिन्यात न्यूझीलंड ए विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुभमन गिलने दुहेरी शतक झळकावले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने 83 धावा केल्या, तर दुसर्‍या डावात त्याने नाबाद 204 धावा केल्या. तरी गीलला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या