
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे सोमवारपासून सुरू होणार आहे. या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ हिंदुस्थानविरुद्ध अद्याप जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही. येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिकादेखील गमवावी लागेल. असे झाल्यास हिंदुस्थानविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये हिंदुस्थानने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे टीम इंडियापेक्षा नेहमीच जड राहिले आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले गेले आहेत ज्यामध्ये हिंदुस्थानला केवळ 4 कसोटी जिंकता आल्या आहेत. हिंदुस्थानने यापैकी 10 सामने गमावले आहेत. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.
विराट कोहली हा अशा कसोटी कर्णधारांपैकी एक आहे जो आपल्या विनिंग टीम का@म्बिनेशनमध्ये शक्यतो बदल करत नाही. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रहाणे आणि पुजाराची जागा पक्की असेल. मात्र जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर उमेश यादवला संधी मिळू शकते. कारण त्याच्याकडे वेग आहे. त्यामुळे त्याला संघात शार्दुल ठापूरच्या जागी संधी मिळू शकते. वॉण्डरर्सच्या खेळपट्टीवरील गवत आणि वेग उमेश यादवच्या गोलंदाजीला साजेसा आहे.
जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया अपराजित
जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाचा हा सहावा कसोटी सामना असेल. हिंदुस्थानने याआधी येथे खेळलेले 5 पैकी 2 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 3 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. जोहान्सबर्गचे आकडे टीम इंडियाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट आहे. तसेच पहिली कसोटी जिंकल्यामुळे टीम इंडिया अधिक आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल.
दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संभाव्य संघ
के. एल. राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठापूर / उमेश यादव.


























































