IND vs SA पंतच्या चुकांची ‘हॅटट्रीक’, जीवदानाचा फायदा उठवत ड्यूसेनने केला विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन वन डे सामन्यांची मालिका हिंदुस्थानने याआधीच गमावली आहे. आज या मालिकेतील तिसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानला यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या चुकांची हॅटट्रीक पाहायला मिळाली.

केपटाऊन वन डे मध्ये दक्षिण आफ्रिकेचे पहिली तीन खेळाडू झटपट बाद झाले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रासी वेन डर ड्यूसेन यालाही स्वस्तात बाद करण्याची एक संधी हिंदुस्थानकडे चालून आली होती. ड्यूसेन 12 धावांवर असताना जयंत यादवच्या गोलंदाजीवर पंतने एक सोपा झेल सोडला. पंतचे खराब यष्टीरक्षण इथेच संपले नाही तर हाच ड्यूसेन 48 धावांवर असतानाही त्याच्या बॅटला लागून गेलेला चेंडू पंतला पकडता आला नाही. पुढे ड्यूसेनने अर्धशतक ठोकले आणि डीकॉकसोबत चौथ्या विकेटसाठी शतकीय भागिदारी केली.

चुकांची ‘हॅटट्रीक’

वन डे मालिकेमध्ये यष्टीमागे पंत चुकांवर चुका करत आहे. याआधी पहिल्या दोन वन डे मध्येही पंतची सुमार कामगिरी ठळकपणे दिसून आली होती. पहिल्या लढतीतही पंतने युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ड्यूसेनचा सोपा झेल सोडला होता आणि पुढे त्याने शतकी खेळी करत हिंदुस्थानचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या लढतीत पंतने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉक याला यष्टीचित करण्याची संधी गमावली होती. या लढतीत डीकॉकने 78 धावा चोपल्या होत्या. या सामन्यासह हिंदुस्थानने मालिकाही गमावली होती.

ड्यूसेनचा विक्रम

दरम्यान, मधल्या फळीत खेळणारा रासी वेन डर ड्यूसेन दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वाचा खेळाडू बनत चालला आहे. घरच्या मैदानावर खेळताना गेल्या पाच वन डे मध्ये त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतक ठोकले आहे. नाबाद 123, 60, नाबाद 129, नाबाद 37 आणि 52 अशी कामिगीरी त्याने पाच डावात केली आहे.