INDvsSL अय्यरचे अर्धशतक, जाडेजाचे तुफान; दुसऱ्या लढतीसह टीम इंडियाने मालिकाही जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मशाळामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत यजमान हिंदुस्थानने पाहुण्या श्रीलंकेचा सात विकेट्सने पराभव केला. श्रेयस अय्यर याने शानदार अर्धशतक ठोकले तर रविंद्र जाडेजा याने तुफानी खेळी करत टीम इंडियाला विजयी केले. या विजयासह टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 184 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानला पहिल्याच षटकात धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा चमिराच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. यानंतर सहाव्या षटकात सलामीवीर ईशान किशन देखील 16 धावा काढून बाद झाला.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दरम्यान 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 39 धावा करणारा संजू सॅमसन बाद झाला. फर्नांडोने स्लीपमध्ये त्याचा जबरदस्त झेल घेतला. यानंतर रविंद्र जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. जाडेजाने 18 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतने नाबाद 45 धावा केल्या, तर अय्यरने 44 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावा चोपल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 षटकांमध्ये 5 बाद 183 धावा केल्या. श्रीलंकेच्या खेळाडूंनी अखेरच्या पाच षटकांमध्ये सत्तरहून अधिक धावा चोपल्या. श्रीलंकेकडून पथून निसंका याने सर्वाधिक 75 धावा केल्या, तर शनाकाने 19 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. गुणतिलका याने 38 धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक, तर फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. हर्षल पटेल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चार षटकांमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी 52 धावा लुटल्या.