IND vs WI Test – सिराज-बुमराहची भेदक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा संघ 162 धावांमध्ये गारद

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाला. मालिकेतील पहिला सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर सुरू आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत रॉस्टन चेसचा निर्णय चुकीचा ठरवला. उपहारापर्यंत हिंदुस्थानने वेस्ट इंडिजाचा निम्मा संघ 90 धावांमध्ये आटोपला होता. उपहारानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजला मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने तडाखा दिला आणि विंडीजचा संघ 162 धावांमध्ये गुंडाळला.

मोहम्मद सिराज याने चंद्रपॉलला ध्रुव जुरेलकरवी झेलबाद करत पहिली विकेट घेतली. त्यानंतर वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज मोठा धावसंख्या उभारू शकला नाही. जस्टीन ग्रीव्हज याने 32 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांना हिंदुस्थानी गोलंदाजांनी मैदानात पाय रोवू दिले नाही. शाई होपने 26, रोस्टन चेसने 24 धावांचे योगदान दिले.

हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाजी मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहाने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.