इंदापूरात मजुरांअभावी खरीप हंगाम करपत चालला

इतर पिकांच्या तुलनेत पेरूच्या बागांमध्ये मिळणारा रोजगार, वाहनांचे भाडे आणि कमिशनच्या मोहापायी मजुरांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अधिकच्या पैशांचे आमिष दाखवून मजुरांना त्यांच्या गावापासून दूर असलेल्या गावात शेतीच्या कामांसाठी नेणाऱ्या अघोषित ठेकेदारांची सुरू असणारी चलती या बाबींमुळे खरीप हंगामात फळबागांव्यतिरिक्त इतर पिकांच्या पेरणीच्या कामांसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने मजुरांअभावी खरीप हंगाम करपत चालल्याचे इंदापूर तालुक्यामधील प्रत्येक गावातील चित्र आहे.

शेतीच्या कामासाठी शेतमजूर महिलेला प्रतितास 60 रुपये याप्रमाणे दिवसाची 300 रुपये हजेरी दिली जाते. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत ते कामे निपटतात. त्यापुढे जर काम करण्याचा आग्रह धरला, तर 60 रुपये तासाने त्यांचा ओव्हरटाइम सुरू होतो. शेतमजूर पुरुषाला प्रतिदिवस 600 रुपये हजेरी दिली जाते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात तो कामे करतो.

मात्र, हे वरवर दिसणारे चित्र आहे. फळबागा, विशेषतः पेरूच्या बागांचे क्षेत्र वाढले. त्यामध्ये महिला व पुरुष शेतमजुरांना अधिक पैसे कमावण्याची संधी मिळू लागली. त्यामुळे इतर पिकांच्या कामासाठी मजूर मिळेनासे होऊ लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पेरूच्या बागांना बांबू, तारकाठी करणे, ओढणे या कामांत इतर पिकांच्या तुलनेत चांगले पैसे मिळतात. त्यामुळे ते काम करणाऱ्या पुरुष मजुरांच्या टोळ्या तयार झाल्या आहे. एकरी किमान पाच हजार रुपये दराने त्या टोळ्या हे काम घेत आहेत. पटापट काम करायचे, दाम घेऊन मोकळे व्हायचे, लगेच दुसऱ्या कामाकडे लक्ष केंद्रित करायचे, असा पैसा मिळवण्याचा वेगवान फंडा त्यातून निर्माण झाला आहे.

पेरूच्या बागेत पेरूला फोम बसविण्याचे काम महिला मजाला दिले जाते. एक फोम बसविण्यासाठी 80 ते 90 पैसे हजेरी दिली जाते. एक महिला एका दिवसात कमीत कमी हजार फोम बसविते. एका दिवसात 900 रुपये कमाविते. त्यामुळे पेरूच्या बागांमधील कामांकडे महिला पुरुष शेतमजुरांचा ओढा वाढत चालल्याचे दिसत आहे.

याखेरीज स्थानिक मजुरांना मजुरीसाठी परगावी नेणाऱ्या इसमांचा व्यवसाय सध्या तेजीत सुरू आहे. वास्तविक पाहता, प्रत्येक गावात मजुरीचे दर निश्चित असतात. मात्र, परगावच्या शेतकऱ्यांना झटपट काम करण्यासाठी मजूर पुरविण्याच्या बदल्यात कमिशनची मागणी करायची, स्थानिक मजुरांना अधिकच्या रोजगाराचे आमिष दाखवून कामासाठी परगावात न्यायचे, असा मजूर पुरविणाऱ्या अघोषित ठेकेदारांचा एक वर्ग तालुक्यात तयार झाला आहे. त्यांच्याकडे वाहन असले तर दुधात साखर! नसले तर एखाद्या वाहनमालकाला तोंडी कराराद्वारे तयार करायचे व त्याला मिळणाऱ्या दुधावरची साय खायची, वरून संबंधित शेतमालकाकडून कमिशनही काढायचे, हे काम हा वर्ग मोठ्या शिताफीने करीत आहे.

मजुरीच्या कामांच्या दृष्टिकोनातून योग्य असलेल्या युवावर्गातील अनेकांनी शिक्षण झाल्यानंतर आलेल्या शहाणपणामुळे शेतीतील कामांपेक्षा जास्तीचा रोजगार मिळवून देणाऱ्या बांधकाम व सेवाक्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा फटका शेतीला बसतो आहे. या सर्व स्थितीमुळे खरीप हंगाम करपत चालला आहे.

सध्याच्या काळात शेतकरी जातीने लक्ष घालून शेती करत नाहीत. शेतीची भिस्त मजूरांवर ठेवून शेती करतो आहे. हे अयोग्य आहे. इंदापूर तालुक्यामधील गावांमध्ये तालुक्यातील मजूरच काम करत आहेत. ही सुदैवाची गोष्ट आहे. मावळ सारख्या भागात कांद्याच्या काढणीच्या निमित्ताने परप्रांतीय शेतमजूरांचा शिरकाव झाला आहे. इमारतीच्या बांधकामांमध्ये परप्रांतीयांशिवाय पर्याय उरला नाही तशी वेळ शेतीच्या कामांमध्ये येवू नये.युवराज शिंदे, शेतकरी आठभाई मळा, इंदापूर