
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुस्थानचा 72 वा स्वातंत्र्य दिन मुंबईत देशभक्तिपूर्ण वातावरणात मोठय़ा उत्साहात आज साजरा झाला. मंत्रालय आणि महानगरपालिकेसह विविध सरकारी कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांनी झेंडावंदन करून राष्ट्राप्रति आदरभाव व्यक्त केला. खासगी सोसायटय़ांमध्येही नागरिकांनी विविध देशभक्तिपर कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिन साजरा केला. रेल्वे स्टेशन्स, बेस्ट आणि एसटी डेपो या ठिकाणी देशभक्तिपर गीते वाजवण्यात आली. मुंबईत विविध ठिकाणी शहीदांप्रति आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
विधान भवन येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. मुंबई काँग्रेसचे टिळक भवन मुख्यालय, भाजपचे चर्चगेट येथील मुख्यालय तसेच अन्य राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण झाले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या 30 जवानांनी बाईक रॅली काढून महिला आणि बालसुरक्षेचा संदेश दिला.
महानगरपालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळय़ास महापौरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुरक्षा दल व अग्निशमन दलातर्फे यावेळी मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण, रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. या सोहळय़ाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव डी. के. जैन आदी उपस्थित होते.






























































