लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा इतिहास बदलणार; यंदा लहान मुलांना प्रवेश नाही, व्हीव्हीआयपींच्या प्रवेशालाही कात्री

509

स्वातंत्र्य दिन म्हटले की पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून होणारे भाषण आणि त्या औचित्याने पंतप्रधानांची लहान मुलांची होणारी भेट हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. यंदा मात्र कोरोनामुळे हे चित्र बदलणार आहे. लाल किल्ल्यावर होणाऱया स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यंदा या कार्यक्रमात लहान मुलांना आणि नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश दिला जाणार नसल्याचे कळते. इतिहासात पहिल्यांदाच हा बदल केला जाणार आहे.

देशभरात कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनावरदेखील सावट पसरले आहे. त्यामुळे यंदा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिन कसा साजरा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर यावरील पडदा उघडला असून यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्यावर होणाऱया कार्यक्रमात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतला आहे. या निर्णयानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत अवघ्या 20 टक्के व्हीव्हीआयपींना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत यंदाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संरक्षण सचिवांनी केला होता दौरा

यंदा लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कसे करायचे या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार आणि एएसआयचे संचालक यांनी लाल किल्ल्यावर दौरा केला होता. त्यानंतर येथील आढावा घेताना त्यांनी वरील बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात येणार आहेत.

त्या ठिकाणी फक्त 100 जणांनाच परवानगी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान देशाला संबोधित करताना त्यांच्या शेजारील दोन्ही भागांत दरवेळी 900 व्हीव्हीआयपींची बसण्याची व्यवस्था करण्यात येते. यंदा मात्र याठिकाणी कोणालाही बसण्याची परवागी देण्यात येणार नाही. व्हीव्हीआयपींची व्यवस्था त्याहून खाली असलेल्या जागी करण्यात येणार असून फक्त 100 जणांनाच ही संधी मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या