
सामना ऑनलाईन । बंगळुरू
मयांक अग्रवालचे नाबाद द्विशतक आणि पृथ्वी शॉच्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात पकड मिळविली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या २४६ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थान ‘अ’ संघाने २ बाद ४११ धावसंख्येपर्यंत मजल मारून पहिल्या डावात १६५ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अग्रवाल २२० धावांवर खेळत होता, तर कर्णधार श्रेयस अय्यर त्याला ९ धावांवर साथ देत होता.
पहिल्या दिवसाच्या ८ बाद २४६ धावसंख्या उभारणाऱ्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा डाव रविवारी दुसऱ्या दिवशी त्याच धावसंख्येवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरल्यानंतर मयांक अग्रवाल (खेळत आहे २२०) व पृथ्वी शॉ (१३६) यांनी ५८.८ षटकांत २७७ धावांची खणखणीत सलामी देत हिंदुस्थान ‘अ’ संघाला झकास सुरुवात करून दिली.
डेन पाइडेटने शॉला बाद करून ही जोडी फोडली, मात्र तोपर्यंत या मुंबईकर फलंदाजाने १९६ चेंडूंत एक षटकार व २० चौकारांसह १३६ धावांची खेळी केली होती. शॉच्या जागेवर आलेल्या रविकुमार समर्थने ३७ धावांची खेळी केली. डुएन ओलिवियरने त्याला यष्टीमागे रुडी सेकंडकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला दुसरे यश मिळवून दिले. अग्रवालने २५० चेंडूंच्या खेळीत ४ षटकार व ३१ चौकारांसह आपली नाबाद २२० धावांची खेळी सजविली.



























































