
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे ढीगभर पुरावे दिल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी कमालीची आक्रमक झाली आहे. भाजप व आयोगाच्या संघटित मतचोरीचा जाब विचारण्यासाठी व मतदार फेरपडताळणीविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी इंडिया आघाडी सोमवार, 11 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक देणार आहे.
लोकसभा व त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक होता. यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. काँग्रेससह इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांनी या गडबडगुंत्याचा शोध सुरूच ठेवला होता. त्यातून बंगळुरूमध्ये मतदारसंघातील एक लाखाहून अधिक मतांच्या चोरीचा पर्दाफाश झाला.
मतांची ही चोरी कशी झाली, निवडणूक आयोगाने ती कशी होऊ दिली, त्यात कोणाचा सहभाग होता या सगळय़ांची उत्तरे निवडणूक आयोगाकडे मागितली जाणार आहेत. त्यासाठी इंडिया आघाडी सोमवारी ‘संसद भवन ते निर्वाचन सदन’ असा विराट मोर्चा काढणार आहे. शिवसेना, काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्ष यात सहभागी होणार आहेत. इंडिया आघाडीच्या या मोर्चामुळे निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले आहे.
एसआयआरविरोधात आवाज बुलंद करणार
मतचोरी चव्हाटय़ावर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार फेरपडताळणी प्रक्रियेवरील संशय आणखी वाढला आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून मोठय़ा संख्येने मतदारांना वगळण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे. मतचोरीचे पुरावे हाती लागल्यामुळे त्या आरोपाला बळकटी मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया थांबवण्याची मागणीही इंडिया आघाडीकडून आयोगाकडे केली जाण्याची शक्यता आहे.