
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले असा दावा केला आहे. दोन्ही देशातील युद्ध अण्वस्त्रयुद्धात रूपांतरित होऊ शकले असते, परंतु टॅरिफचा धाक दाखवून मी ते रोखले, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी ‘फॉक्स बिझनेस’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी आठ युद्धे मिटवली. त्यापैकी किमान सहा युद्धे केवळ टॅरिफमुळे मिटली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मी त्यांना बजावले होते की जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही, तर मी तुमच्यावर प्रचंड टॅरिफ लादीन, कारण मला लोक मरताना पाहायचे नाहीत.
टॅरिफचा युद्धाशी काय संबंध? असे त्यांनी मला विचारले. यावर मी म्हणालो की, युद्ध सुरू राहिले तर तुम्हाला जास्त टॅरिफ भरावा लागेल. हिंदुस्थान-पाकिस्तान बाबतीतही असेच घडले. दोन्ही देश अण्वस्त्रयुद्धाच्या जवळ पोहोचले होते. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत होते. 10 विमाने पाडली गेली होती. त्यानंतर टॅरिफची भीती दाखवून मी हे युद्ध थांबवले, असे ट्रम्प पुन्हा म्हणाले.
हे युद्ध थांबवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले होते की, ट्रम्प यांनी आमचे युद्ध थांबवून किमान 1 कोटी लोकांचे प्राण वाचवले. कारण माझ्या मते, ते अण्वस्त्रांचा वापर करणार होते. टॅरिफशिवाय हे शक्य झाले नसते, असेही ट्रम्प यांनी सांगितले. याचा व्हिडीओ काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
ट्रंप ने 75वीं बार किया दावा
“10 प्लेन मार गिराए गए. अगर मैं टैरिफ़ की बात न करता तो भारत-पाकिस्तान में न्यूक्लियर युद्ध हो जाता”
अमेरिकी राष्ट्रपति ट्रम्प pic.twitter.com/Ivab2NvbwW
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) February 11, 2026
दरम्यान, गतवर्षी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले होते. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पीओके आणि पाकिस्तानमधील तळ उद्ध्वस्त केली होती. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही बाजूने जोरदार हल्ले सुरू होते. जवळपास 4 दिवस हा संघर्ष सुरू होता. यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली. ही शस्त्रसंधी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांनी आतापर्यंत 80 हून अधिक वेळा हे युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. मात्र हिंदुस्थाननेकोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी सातत्याने नाकारली आहे.



























































