हिंदुस्थानचा प्रस्ताव अमेरिकेला मान्य, कोरोनाच्या लसी ‘पेटंटमुक्त’ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगाला मोठी खूशखबर आहे. लवकरच कोरोना प्रतिबंधक लसींवरील पेटंट हटवला जाणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसह अनेक देशांत लसींचे उत्पादन झपाटय़ाने वाढेल. परिणामी, लसींच्या किमतीत घसरण होईल. यासंदर्भात हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिकेने मांडलेल्या प्रस्तावाला अमेरिकेसह विविध देशांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावाचा गरीब आणि विकसनशील देशांना मोठा फायदा होणार आहे.

सध्या पेटंट सुरक्षेमुळे गरीब देशांना कोरोना लसी मिळवणे मुश्कील बनले आहे. परिणामी, कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर लसींच्या पुरवठय़ाला गती देण्यासाठी पेटंट तात्पुरत्या काळाकरिता हटवा, असा प्रस्ताव हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) मांडला होता. त्यावर लसींना बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षेतून बाहेर ठेवण्याचा प्रस्ताव आणि डब्ल्यूटीओच्या उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच केनिया, पाकिस्तान, बोलीविया, व्हेनेझुएला, झिम्बाब्वे, इजिप्त, अफ्रिकन ग्रुप आणि एलडीसी ग्रुपनेही प्रस्तावाचे समर्थन केले आहे. अमेरिका, युरोपिय संघ, पॅनडा, न्यूझीलंड प्रस्तावावर चर्चेला तयार आहे. केवळ जर्मनी, स्वित्झर्लंड, ब्रिटन, ब्राझील आणि जपान या देशांनी प्रस्तावाला विरोध केला आहे. प्रस्तावामुळे फार्मा कंपन्यांचे नुकसान होईल, असे संबंधित देशांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूटीओ अंतिम निर्णय काय घेतेय याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सध्या ही आहे समस्या

संपूर्ण जगाला कोरोना लसींची नितांत गरज आहे, मात्र त्या प्रमाणात लसींचे उत्पादन होत नाहीय. याचे मुख्य कारण म्हणजे लस बनवण्याची व्यवस्था प्रत्येक देशांकडे नाही. ज्या कंपन्यांकडे ही व्यवस्था आहे त्या कंपन्या या उत्पादनाचे पेटंट करून घेतात. त्यामुळे इतर कंपन्या तशा प्रकारची लस बनवू शकत नाहीत. तसेच ज्या कंपन्यांकडे पेटंट आहे त्यांच्याजवळ गरजेच्या प्रमाणात उत्पादनाची क्षमता नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी आहे. परिणामी, जगभरातील लसीकरण मोहिमेने अजून गती घेतलेली नाही.

‘पेटंटसूट’मुळे हे फायदे होणार

सध्या लसींच्या पेटंटमुळे लसींचे उत्पादन समान पातळीवर होत नाही. पेटंटमध्ये सूट मिळाल्यानंतर गरीब व विकसनशील देशांचे लस उत्पादनसंबंधी टेन्शन दूर होईल.
लसींसंबंधी रिसर्च, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंगपासून अगदी पुरवठय़ापर्यंतच्या सर्व प्रक्रियांना गती मिळेल.
हिंदुस्थानसह अनेक देशांत लसींचे उत्पादन वाढेल. देशातच उत्पादन होईल. त्यामुळे लसी स्वस्त होतील.