पुरातत्व खात्याचा अहवाल कुणा सामान्याचे मत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणात मुस्लिम पक्षावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय चांगलेच संतापले. पुरातत्व खात्याच्या 2003 मधील अहवालावर मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर हा अहवाल म्हणजे कुणा सामान्याचे मत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पुरातत्वशास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास करूनच यात निष्कर्ष मांडले आहेत, अशा शब्दांत न्यायालयाने वकिलांचे कान उपटले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाचसदस्यीय घटनापीठापुढे शुक्रवारी 33 व्या दिवसाची सुनावणी झाली. यावेळी मुस्लिम पक्षातर्फे मीनाक्षी अरोरा यांनी युक्तिवाद केला. पुरातत्व खात्याचा अहवाल हे पुरातत्वशास्त्रज्ञांचे केवळ मत आहे. अयोध्येत राममंदिर होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मताला ठोस पुराव्यांचा आधार नाही. हा अहवाल ‘मूलभूत पुरावा’ होऊ शकत नाही. अहवालाला शास्त्र्ााrय कमी आणि कल्पनेचाच अधिक आधार असल्याचे म्हणणे ऍड. अरोरा यांनी मांडले. त्यावर तुम्ही अहवालाच्या सत्यतेवर शंका घेऊ शकत नाही. उत्खननामध्ये हाती लागलेल्या साहित्याबाबत मत नोंदवण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरातत्वशास्त्रज्ञांना दिला होता. त्यानुसार त्यांनी सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला असल्याचे घटनापीठाने ऍड. अरोरा यांना बजावले.

युक्तिवाद करताना वेळेचे भान ठेवा

ऍड. मीनाक्षी अरोरा यांनी आपले युक्तिवाद निर्धारित वेळेत पूर्ण केले नाहीत. दुसरे वकील शेखर नाफडे यांच्यासाठी राखीव असलेला वेळही घेतला. त्यावर न्यायालय चांगलेच संतापले. सुनावणी ठरलेल्या वेळेनुसार का पूर्ण होत नाही? वेळेचे भान ठेवून युक्तिवाद करा, अशा शब्दांत न्यायालयाने ऍड. अरोरा यांना सुनावले.