
युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी यांच्यावर भैरव नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या स्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून नगरमधून सद्भावना सायकल यात्रा निघालेली आहे. यामध्ये 100 सायकलस्वारांचा समावेश आहे. दोन देश आणि पाच राज्ये असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून सद्भावना यात्रा नुकतीच बांगलादेशात दाखल झाली आहे. बांगलादेशी नागरिकांकडून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे.
नगरच्या स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित सद्भावना सायकल यात्रेला गांधी जयंतीला, 2 ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. याअंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बांगला देशातून तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. 13 नोव्हेंबरला हिंदुस्थान- बांगलादेशच्या सरहद्दीवरील पेट्रोपोल येथे सद्भावना यात्रा पोचली. तिथून 11 जणांनी बांगलादेशात प्रवेश केला. डॉ. गिरीश कुलकर्णी, भूषण देशमुख, डॉ. मनीषा लधा, डॉ. अंकुश आवारे, ऍड श्याम असव, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, फारूख बेग, योगेश गवळी, विशाल अहिरे, गिरीश भारत कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत.
यात्रेदरम्यान 1971 सालच्या युद्धात शहीद झालेल्या हिंदुस्थानी जवानांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तुंगीपारा येथे वंगबंधू शेख मुझीप्फूर रेहमान यांच्या स्मृतिस्थळला भेट देण्यात आली. बांगला युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली जाणार आहे. प्रेम आणि सलोख्याचा संदेश घेऊन यात्रा मार्गक्रमण करत आहे, असे भूषण देशमुख यांनी सांगितले.
पेट्रापोल आणि बेनापोलच्या दरम्यान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सायकल यात्रेचे स्वागत केले. प्रार्थना, गाणी म्हणत, पथनाटय़ सादर करत या यात्रेने सर्वांची मनं जिंकली. पुढे सायकली घेऊन आम्ही बांगलादेशच्या भूमीवर पाऊल ठेवलं, तेव्हा स्वागतासाठी ढाक्याहून मंडळी आली. बेनापोलहून जस्सोरकडे जाताना बांगलादेशवासीय मोठय़ा कौतुकानं आम्हा सायकल यात्रींकडे पाहत होते. सद्भावनेचं नवं पर्व सुरू झालं, अशा भावना यात्रेत सहभागी झालेल्यांनी व्यक्त केल्या.

























































