महिनाअखेरीस बँका चार दिवस बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकांतील पैशांचा व्यवहार वा इतर कामे 25 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. कारण, विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बँकांचे कर्मचारी 26 व 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी लागून येणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 30 ऑगस्टला 10 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोनदिवसीय संपाचे अस्त्र उगारले आहे. केंद्रीय ट्रेड युनियन ऑल इंडिया ट्रेडर्स युनियन काँग्रेसनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. कर्मचारी 26 व 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यानंतर 28 सप्टेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे तर 29 सप्टेंबरला रविवारची सुट्टी असेल. 30 सप्टेंबरला ‘हाफ इयरली क्लोजिंग’ असल्यामुळे या दिवशी पैशांची देवाणघेवाण होणार नाही. 1 ऑक्टोबरला बँकांतील कामे होतील. मात्र 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे बँकांची दारे पुन्हा बंद राहणार आहेत. एकूणच सप्टेंबरअखेरीपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत बँकांचे कामकाज विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक कुचंबणा होणार आहे.