हिंदुस्थानच्या विजयाची नवमी, रवींद्र जाडेजाऐवजी संघात आलेल्या युजवेंद्र चहलची कमाल

युजवेंद्र चहल रवींद्र जाडेजाचा बदली खेळाडू म्हणून आला आणि त्याने चक्क टी-20 सामना फिरवला. त्याने कर्णधार ऍरोन फिंच, प्रमुख खेळाडू स्टीवन स्मिथ व या लढतीत फॉर्ममध्ये असलेल्या मोयसेस हेनरीक्स यांना 25 धावांच्या मोबदल्यात पॅव्हेलियनमध्ये पाठवून हिंदुस्थानला पहिल्या  टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी दमदार विजय मिळवून दिला. टीम इंडियाने या विजयासह तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. युजवेंद्र चहलचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

टीम इंडियाने  टी-20मध्ये नवव्या विजयाला गवसणी घातलीय.  श्रीलंकेविरुद्धची गुवाहाटी (5 जानेवारी, 2020) येथील लढत रद्द झाली होती. त्यामुळे टीम इंडियाची ही घोडदौड सलग म्हणता येणार नाही; पण मागील दहा लढतींमध्ये या संघाचा एकदाही पराभव झालेला नाहीए.

  दमदार सलामीनंतर घसरगुंडी

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 162 धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियाची सुरुवात शानदार झाली. डार्सी शॉर्ट (34 धावा) व ऍरोन फिंच (35 धावा) यांनी 56 धावांची सलामी दिली. पण या दमदार सुरुवातीचा कांगारूंना फायदा घेता आला नाही. टी. नटराजन व युजवेंद्र चहल यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. अखेर त्यांना 150 धावांपर्यंतच मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदरनेही टिच्चून मारा केला.

  राहुल, जाडेजा चमकले 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलने 40 चेंडूंत 51 धावांची खेळी साकारली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तसेच ऍडम झाम्पा, मिचेल स्वेपसन व मोयसेस हेनरीक्स यांच्या गोलंदाजीवर हिंदुस्थानी फलंदाजांनी विकेट गमावले. त्यामुळे 1 बाद 48 या धावसंख्येवरून हिंदुस्थानची अवस्था 6 बाद 114 धावा अशी बिकट झाली. यावेळी मागील लढतीतील स्टार फलंदाज रवींद्र जाडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने हिंदुस्थानला 161 धावसंख्या गाठून दिली. रवींद्र जाडेजाने एक षटकार व पाच चौकारांसह नाबाद 44 धावा तडकावल्या.

  ‘कनकशन सब’ हा नियम केव्हा लागू होतो 

आयसीसीकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात ‘कनकशन सब’ म्हणजेच बदली खेळाडूला अंतिम अकरा जणांच्या चमूत खेळण्याची मुभा देण्यात आहे. ‘कनकशन सब’ म्हणजे मेंदूला झालेल्या दुखापतीनंतर त्या खेळाडूला बाहेर बसवून त्याच धाटणीतल्या खेळाडूला संघात स्थान दिले जाते. अशा परिस्थितीत फलंदाज जखमी झाला तर फलंदाजच संघात घेतला जातो. रवींद्र जाडेजा जखमी झाल्यानंतर युजवेंद्र चहल हा त्याच्याच सारखा फिरकी गोलंदाज संघात घेतला गेला. मात्र ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सामनाधिकारी डेव्हीड बून यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागला असला तरी त्याने संपूर्ण षटके फलंदाजी केली, असे जस्टीन लँगर यांचे म्हणणे होते. आता रवींद्र जाडेजाच्या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे असे बीसीसीआयकडून यावेळी सांगण्यात आले.

  संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थाना – 20 षटकांत 7 बाद 161 धावा (लोकेश राहुल 51 धावा, रवींद्र जाडेजा नाबाद 44 धावा, मोयसेस हेनरीक्स 22 धावा देत तीन बळी टिपले, मिचेल स्टार्क 34 धावा देत दोन बळी टिपले) विजयी वि. ऑस्ट्रेलिया 7 बाद 150 धावा (डार्सी शॉर्ट 34 धावा, ऍरोन फिंच 35 धावा, मोयसेस हेनरीक्स 30 धावा,  टी. नटराजन 30 धावा देत तीन बळी टिपले, युजवेंद्र चहलने 25 धावा देत तीन बळी टिपले).

 

आपली प्रतिक्रिया द्या