महिंद्रा गुपकडून कॅनडातील व्यवसाय बंदचा निर्णय

हिंदुस्थान आणि कॅनडातील राजनैतिक तणावाचे पडसाद उद्योग, व्यवसायातही पडताना दिसत आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा ग्रुपने कॅनडातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राची कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने आपले संपूर्ण कामकाज थांबविले आहे. दरम्यान, मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची पडझड सुरूच असून, तीन दिवसांत गुंतवणूकदारांना तब्बल 5.40 लाख कोटी रुपयांना फटका बसला आहे.

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा ग्रुपने गुरुवारी मोठी घोषणा करताना त्यांनी कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कार्य थांबविल्याचे जाहीर केले. कंपनीत 11.18 टक्के हिस्सा होता. महिंद्रा ऍण्ड महिंद्राने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून 20 सप्टेंबर 2023ला ऑपरेशन्स बंद करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत. याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केले आणि आता 20 सप्टेंबरपासून कंपनीची सहयोगी नाही.

गुंतवणूकदार हादरले
मुंबई शेअरबाजारात तीन सत्रांत सेन्सेक्स तब्बल 1608 अंकांनी कोसळला आहे. सोमवारी 242 अंकांनी पडझड झाली. मंगळवारी गणेश चतुर्थीमुळे सुट्टी होती. बुधवारी 796 अंकांनी तर गुरुवारी 570 अंकांनी सेन्सेक्स कोसळला. गुंतवणूकदारांचे तीन सत्रांत 5.40 लाख कोटी बुडाले. यामुळे गुंतवणूकदार हादरले आहेत.