
‘चीनने आक्रमण केलं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करायला तयार नाहीत. मग 20 जवान कसे मारले गेले? 20 जवान मारले जाणं ही संख्या कमी नाही. याची जबाबदारी कुणाला तरी स्वीकारावी लागेल,’ असे वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘1967 नंतर आजपर्यंत चीनच्या सीमेवर कोणत्याही सैनिकाने प्राण गमावलेले नाही. 20 जवान मारले जाणं ही संख्या कमी नाही. याची जबाबदारी कुणाला तरी स्वीकारावी लागेल. सगळ्यांनी हात वर करून कसं चालेल,’’ असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘हिंदुस्थान-चीन सीमाभागात काहीच झालं नाही, असं म्हणून कसं चालेल! सर्व हिंदुस्थानींच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवं. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. यासाठी आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत; पण सत्य समोर यायला हवं,’ असे आव्हाड म्हणाले.
महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत
‘विरोधी पक्ष नको त्या गोष्टींचं राजकारण करत आहे. सध्या परिस्थिती अवघड आहे. या शहरावर आरोग्य यंत्रणेचा ताण पडणार, यावर कुणाचं दुमत नाही. ही आपत्कालीन परिस्थिती आहे. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत. आम्ही प्रेमाने वागतोय, निर्णय घेतोय. पुढे जाण्याच्या मानसिकतेतून काम करतोय,’ असे सांगून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सरकारच्या कारभारावरील टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आज कोरोना विषाणूचं जागतिक संकट निर्माण झालं आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष नको त्या गोष्टींत राजकारण करू पाहत आहे. असं करून चालणार नाही.’

































































