लडाख सीमेवर चाललेय काय?

1903
प्रातिनिधिक

कोरोना महामारीत लडाख सीमेवरील लाईन ऑफ अॅकच्यूअल कंट्रोलवर (एलएसी) स्टॅण्ड ऑफ असून, हिंदुस्थान आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे आहेत. या स्थितीत चीनकडून येणारे उलट-सुलट वक्तव्ये आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्यावर घेतलेली उडी यामुळे लडाख सीमेवर सध्या काय सुरू आहे? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

लडाख सीमेजवळ आपल्या सैन्याची जमवाजमव करणाऱया चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सुरुवातीला युद्धाची भाषा केली. मात्र, त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुसऱया दिवशी चर्चेने प्रश्न सोडवू असा पवित्रा घेतला. हिंदुस्थाननेही आक्रमक पवित्रा घेत एक इंचही मागे हाटणार नाही, असे जाहीर केले. लष्कराच्या टॉप कमांडर्सची तीन दिवसांची बैठक नुकतीच पार पडली. मात्र, विविध वक्त्यव्यांमुळे लडाख सीमेवर काय चालले आहे? याचा खुलासा सरकारकडून झालेला नाही.

मी फोनवर बोललो; मोदींचा मूड ठीक नाही
हिंदुस्थान-चीनमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड ठीक नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या खूप मोठी आहे. दोन्ही देशांचे लष्कर शक्तीशाली आहे. जर त्यांनी मदत मागितली तर मी मध्यस्थी करेल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी-ट्रम्प चर्चा झाली नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. 4 एप्रिल रोजी हायड्रोक्लोरोक्लीन गोळ्यांच्या मुद्यावर शेवटची चर्चा झाली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

मोदी सरकार गप्प का? – राहुल गांधी
सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर मोदी सरकारने मौन बाळगले आहे. चीनबाबत सरकार गप्प का? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे. संकटाच्या काळात अनिश्चितता वाढत आहे. नेमके काय घडत आहे हे सरकारने देशातील जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

ट्रम्प यांचा प्रस्ताव चीनने धुडकावला
मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव चीनने धुडकावला आहे. हिंदुस्थान आणि चीनमधील वाद सोडविण्यास दोन्ही देश सक्षम आहेत. चर्चेतून आम्ही प्रश्न सोडवू तिसऱया पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या