लसीकरणात आघाडी; महाराष्ट्रासह 8 राज्यांनी दिले 58 टक्क्यांच्या पुढे डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील कोरोना लसीकरणाचा वेग जगात सर्वात भारी ठरला आहे. लसीकरणामध्ये देशाला आघाडी मिळवून देण्यात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी विशेष योगदान दिले आहे. या राज्यांमध्ये देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसचे प्रमाण हे देशातील एकूण डोसच्या तुलनेत 58.83 टक्के इतके आहे. देशात अवघ्या 99 दिवसांत तब्बल 14 कोटींहून अधिक डोस दिले गेले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली.

देशभर रविवारपर्यंत 20 लाख 19 हजार 263 सत्रांच्या माध्यमातून कोरोना लसीचे 14 कोटी 9 लाख 16 हजार 417 डोस देण्यात आले. मोहिमेत 92 लाख 90 हजार 528 आरोग्य कर्मचारी आणि 1 कोटी 19 लाख 50 हजार 251 प्रंटलाइन वर्कर्सना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 59 लाख 95 हजार 634 आरोग्य कर्मचारी आणि 62 लाख 90 हजार 491 प्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला. त्याचबरोबर 4 कोटी 96 लाख 55 हजार 753 ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस, तर 77 लाख 19 हजार 730 ज्येष्ठांना दुसरा डोस दिला गेला. तसेच 45 ते 60 वर्षांपर्यंतच्या 4 कोटी 76 लाख 83 हजार 792 नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. देशभरात मागील 24 तासांत 25 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला.