
हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन. आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या संजूला या स्पर्धेतील ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने निर्धारित २० षटकांत २५५ धावांचा डोंगर उभा केला. ही धावसंख्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या संजू सॅमसनने केवळ ४६ चेंडूंमध्ये ८९ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. संजूला इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी मोलाची साथ दिली, ज्यामुळे भारताला अडीचशे पार मजल मारता आली.
२५६ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर पूर्णपणे हतबल दिसला. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांत आटोपला. हिंदुस्थानने हा सामना ९६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून जगाला पुन्हा एकदा आपल्या वर्चस्वाची जाणीव करून दिली.
























































