तारीख पे तारीख! सत्तर वर्षं जुने खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दामिनी या गाजलेल्या हिंदी चित्रपटात सनी देओलच्या तोंडचा एक संवाद प्रसिद्ध आहे. तारीख पे तारीख मिलती है, इन्साफ नहीं मिलता (तारखेवर तारीख मिळते पण न्याय मिळत नाही) अशा अर्थाचा हा संवाद न्यायालयातील प्रलंबित खटल्यांवर आधारित आहे. पण, हा संवाद फक्त चित्रपटापुरता मर्यादित नसून खरोखर देशातील खटल्यांचं वास्तव असल्याचं वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, देशात आजही अनेक असे खटले आहेत, जे वर्षानुवर्षं निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील काही खटले हे सुमारे 70 वर्षं इतके जुने आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वयाहून अधिक काळ हे खटले प्रलंबित आहेत. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयात 27 न्यायमूर्तींच्या जन्मापूर्वीपासून या खटल्याचे वादी-प्रतिवादी न्यायालयात खेटे मारत आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक खटले दाखल झाले होते. महाराष्ट्र निषेध अधिनियम 1949च्या कलम 65ई अन्वये सगळ्यात जुना गुन्हेगारी खटला हा रायगड पोलिसांकडून 18 मे 1953 साली दाखल करण्यात आला होता. ही तारीख सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश्वरी यांच्या जन्माच्या पाच वर्षं आधी उरण येथे हा खटला नोंदवण्यात आला होता. या खटल्यातील आरोपी जंगबहादूर बृजलाल जोशी याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या खटल्यात दोषी आढळल्यास तीन किंवा पाच वर्षांचा कारावास आणि 25 ते 50 हजार रुपये दंड असं प्रावधान होतं. या खटल्यात आरोपीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या खटल्यातील दस्तऐवजांमध्ये सदर आरोपी जिवंत आहे किंवा नाही याचा काहीही उल्लेख नाही. जरी तो हयात असेल तरीही तो अतिशय वृद्ध असेल. या खटल्याची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

रायगड पोलिसांनी त्यानंतर 1956 मध्ये शंकर मालगुंड यांच्याविरुद्ध चोरीचा खटला दाखल केला होता. यात दोषी आढळल्यास सात वर्षांची शिक्षेचं प्रावधान आहे. न्या. महेश्वरी यांच्या जन्मापूर्वीचा हा खटला देखील 9 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याखेरीज 1952मधील पश्चिम बंगाल येथील खटला हा सगळ्यात जुना दिवाणी खटला आहे. तसंच, दुसरा खटला देखील 70 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे.

खटले निकाली काढण्यात कलकत्ता उच्च न्यायालयाचा रेकॉर्ड सगळ्यात वाईट आहे. या न्यायालयात सगळ्या जुना दिवाणी खटला 1951पासून प्रलंबित आहे. तर सगळ्या जुना फौजदारी खटला 1969 पासून प्रलंबित आहे. देशातील 25 उच्च न्यायालयांमध्ये 60 लाख दिवाणी आणि फौजदारी खटले प्रलंबित आहेत.