आता अंबानीसुद्धा म्हणतात खरंच, मंदी आहे!

1282
mukesh-ambani

देशात आर्थिक मंदी असल्याचे अनेक अर्थतज्ञ म्हणत असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही मंदी असल्याचे म्हटले आहे, मात्र ही मंदीची परिस्थिती तात्पुरती आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱयावर आहेत. 29 ते 31 ऑक्टोबरपर्यंत रियाधमध्ये ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’ परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांचे या परिषदेत प्रमुख भाषण होणार आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह हिंदुस्थानातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत. मंगळवारी मुकेश अंबानी यांचे भाषण झाले.

हिंदुस्थानी अर्थव्यवस्था सुस्तावलेली पाहायला मिळते. थोडी आर्थिक मंदी निश्चितच आहे, मात्र ही मंदी तात्पुरती आहे. गेल्या काही महिन्यांत सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम निश्चित दिसेल. पुढील तिमाहीत परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. यावेळी मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदी, सौदीचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद आणि प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले.

हिंदुस्थानच्या आर्थिक विकासदरामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून घट झालेली दिसते. एप्रिल-जून या तिमाहीत विकासदर पाच टक्क्यांपर्यंत खाली आला होता. विकासदर वर्षभरापूर्वी आठ टक्क्यांपर्यंत होता. 2013 नंतरचा हा सर्वांत कमी विकासदर आहे. मात्र यात सुधारणा होईल, असे अंबानी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या