
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पुढच्या महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठी घोषणा करत दारू सोडल्याची माहिती दिली.
न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून लांब आहे. याच दुखापतीतून सावरत असताना त्याने जानेवारी 2025 पासून दारु सोडण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून लवकर बरं होण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने दारु सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. बेन स्टोक्सने एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, “मला नाही वाटत मी दारू पूर्णपणे बंद करू शकने. पण, जानेवारीपासून मी दारू पिलेलो नाही. मी स्वत:ला बजावलं होत की, जोपर्यंत उपचार पूर्ण होत नाहीत आणि मैदानावर परतत नाही, तोपर्यंत मी दारु पिणार नाही”, अस स्टोक्स म्हणाला आहे.