हिंदुस्थान-इस्रायलची ‘सुपर रॅपिड टेस्ट’, कोरोना अहवाल एका मिनिटात मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संशयित रुग्णाचे नमुने घ्या. ते प्रयोगशाळेत पाठवा. अहकालासाठी चोवीस तास थांबा. या कटकटीतून लवकरच सुटका होणार आहे. हिंदुस्थान-इस्त्रायलने संयुक्तरित्या ‘सुपर रॅपिड टेस्ट’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याद्वारे कोरोनाचा अहवाल एका मिनिटात मिळू शकणार आहे. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचीही गरज नाही. तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे जागच्या जागी कळणार आहे.

हिंदुस्थानातील इस्त्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. हिंदुस्थानी आणि इस्त्रायली शास्त्रज्ञांनी संयुक्तरित्या संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी येणारा मोठा खर्च या सुपर रॅपिड टेस्टमुळे वाचणार आहे असे ते म्हणाले. ब्रेथ ऍनालायझरप्रमाणेच ही चाचणी आहे असे माल्का यांनी म्हटले आहे.
अशी होईल चाचणी…
संशयित रुग्णाला एक नळी देण्यात येईल. त्या नळीमध्ये त्याने केवळ फुंकर मारायची आहे. त्यानंतर 30 ते 50 सेकंदांत त्याचा अहवाल मिळेल. या चाचणीचा वापर विमानतळे व अन्य ठिकाणी केला जाऊ शकतो. सरकारी यंत्रणेला चाचणी मोहीमेसाठी या टेस्टचा वापर करणे अधिक सोयीचे होणार आहे.

आवाजावरूनही होऊ शकेल कोरोना चाचणी

हिंदुस्थान-इस्त्रायलने कोरोना चाचणीसंदर्भातील चार प्रकारची तंत्रज्ञाने विकसित केली आहेत. त्यांची चाचणीही केली गेली. यामध्ये संशयित रुग्णाच्या आवाजाची चाचणी करून त्याला कोरोनाची लागण झाली आहे का याचे निदान केले जाऊ शकते.
हिंदुस्थानातच होईल प्रभावी लसीचे सर्वाधिक उत्पादन
हिंदुस्थानातच कोरोनावरील प्रभावी लसीचे सर्वाधिक उत्पादन होऊ शकेल असा विश्वासही माल्का यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे. कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा हिंदुस्थानात उपलब्ध आहेत. हिंदुस्थानच प्रभावी आणि सुरक्षित लसीची निर्मिती करेल आणि लस बनवल्यानंतर इस्त्रायलच्या गरजांचाही विचार करेल असेही माल्का यांनी म्हटले आहे.