
कुरापती पाकिस्तान आणि विस्तारवादी चीन हे दोन देश शेजारी असल्याने हिंदुस्थानला अखंड सावध आणि शस्त्रसज्य रहावे लागते. गेल्यावर्षी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी चीनने पडद्याआडून पाकिस्तानला मदत केली होती. आता या आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी हिंदुस्थानने आता मोठे पाऊल उचलत इस्रायलसमोर संरक्षण करार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
हिंदुस्थान इस्रायलकडून प्रगत ड्रोन्स, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि लेझर-आधारित संरक्षण यंत्रणा घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानकडून होणारे क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन आणि हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थान एक अभेद्य बहुस्तरीय संरक्षण कवच निर्माण करत आहे.
हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 30 किलोवॅट क्षमतेचे Mk-II(A) हे लेझर शस्त्र (DEW) विकसित केले आहे. मात्र, इस्रायलने याआधीच ‘आयर्न बीम’ ही 100 किलोवॅट क्षमतेची उच्च-ऊर्जा लेझर यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. हे तंत्रज्ञान ड्रोन, रॉकेट आणि मॉर्टर अत्यंत कमी खर्चात (काही डॉलर्समध्ये) हवेतच नष्ट करू शकते. हिंदुस्थानला आपल्या संरक्षण ताफ्यात या तंत्रज्ञानाचा समावेश करायचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. 2017 नंतरचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून दोन्ही देशांमध्ये प्रगत शस्त्र तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर भर दिला जाईल. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुतोवाच केले की, हिंदुस्थान, अरब राष्ट्रे, आफ्रिकन देश, ग्रीस, सायप्रस आणि आशियाई देशांना एकत्र घेऊन एक सहाकोनी सुरक्षा युती निर्माण केली जाईल.
दरम्यान, हिंदुस्थान 2035 पर्यंत ‘सुदर्शन चक्र’ ही स्वदेशी बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली विकसित करत आहे. यासाठी इस्रायलच्या आयर्न डोम, ॲरो आणि डेव्हिड स्लिंग या प्रणालींमधील तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. यामध्ये बराक-8 क्षेपणास्त्रांसोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रगत सेन्सर्स आणि सायबर-डिफेन्स यंत्रणांचे एकत्रीकरण केले जाईल. ‘फोर्ब्स इंडिया’च्या अहवालानुसार, 2026 मध्ये इस्रायलने हिंदुस्थानसोबत 8.6 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र करारांना मंजुरी दिली आहे. यामुळे इस्रायल हा फ्रान्सनंतर हिंदुस्थानचा दुसरा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार ठरला आहे.

























































