लादेनला आसरा आणि संसदेवर हल्ल्याची आठवण करून दिली, पाकिस्तानची UN मध्ये बोलती बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दरवेळी कश्मीरचा मुद्दा उकरून काढत हिंदुस्थानविरोधात वाट्टेल ते बरळणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने पुन्हा एकदा सणकावलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा कश्मीरचा राग आळवायला सुरुवात केली होती. हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता पाकिस्तानची बोलती बंद केली.

जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावताना म्हटले की, “ज्या देशाने ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला आसरा देऊन त्याची खातिरदारी केली, ज्या देशाने आपल्या शेजारी राष्ट्राच्या संसदेवर हल्ला केला तो देश संयुक्त राष्ट्रासारख्या प्रबळ मंचावरून प्रवचन देण्याच्या लायकीचा नाही.” जयशंकर यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, बहुसंख्य देश एकत्र येत सुधारणा कशा व्हाव्यात यावर भर देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाचा दृष्टीकोण हा वेगळा असतो, मात्र तरीही एकमत व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. किमान यात तरी अधिक वेळ वाया घालवला जाऊ नये. संपूर्ण जग दहशतवादाचा मुकाबला करत असताना काही जण हे दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना, घातक कारवायांचे कट रचणाऱ्यांना योग्य ठरवत त्यांचा बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांचा गैरवापर करत आहेत. जयशंकर यांनी या वाक्यातून पाकिस्तान आणि चीन या दोन देशांचे नाव न घेता या देशांवर निशाणा साधला.