
ज्यांनी देश घडवण्यासाठी त्याग केला, जी मंडळी आज खुलासे करण्यासाठी हयात नाहीत त्यांच्याविरोधात कोणीही अशाप्रकारे चिखलफेक करू नये असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या सुखाचा त्याग करून ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांच्याबद्दल देशवासीयांच्या मनात आदर आणि आस्था कायम राहील; असे राऊत यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा टीका केली होती. यामुळे महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती. राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजित सावरकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, कोणी सावरकरांवर काही प्रश्न निर्माण केले म्हणून पंडीत नेहरूंवर निर्माण करायचे हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत आणि आम्ही सगळे त्यांच्यासाठी वकिली करत आहोत.
“आमच्यासाठी सावरकर हे प्रिय आहेत आणि वंदनीय आहेत. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि ज्यांनी कोणी या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांच्याबद्दल देशवासीयांच्या मनात आदर आणि आस्था कायम राहील”, असे राऊत यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते असे आपण म्हणतो. त्या विज्ञाननिष्ठतेच्या दिशेने देश नेण्याचे काम पंडीत नेहरूंनी केले, नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. नेहरूंनी हिंदुस्थानचा पाकिस्तान होऊ दिला नाही, याबद्दल हा देश त्यांचा ऋणी आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.


























































