
बरोब्बर तीन वर्षांनी लॉस एंजेलिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिकचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा हिंदुस्थानसाठी पुन्हा पदकाची झुंज ठरणार असून आतापासून हिंदुस्थानचे खेळाडू ‘सुवर्ण स्वप्न’ साकारण्यासाठी तयारीला लागले आहेत. यंदा क्रिकेटचीही टी-20 फटकेबाजी पाहायला मिळणार असून कुस्ती, अॅथलेटिक्स, नेमबाजी, हॉकी आणि बॅडमिंटनसारख्या खेळात हिंदुस्थान सुवर्णसंधीची आशा आहे.
15 ते 30 जुलैदरम्यान रंगणाऱया लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा भव्य उद्घाटन सोहळा 14 जुलैला संध्याकाळी 8 वाजता होणार असून तो एलए मेमोरियल कोलिसियम आणि सो-फाय स्टेडियम या दोन ठिकाणी एकत्रितरीत्या आयोजित केला जाणार आहे. हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी आयोजकांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
क्रिकेटचे शतकानंतर पुनरागमन
1900 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या पुरुषांसह महिला क्रिकेटही रंगणार आहे. महिलांची स्पर्धा 12 ते 20 जुलैदरम्यान खेळवली जाईल. पुरुष संघाचा पहिला सामना 22 जुलै रोजी, तर पदक सामने 29 जुलैला होणार आहेत. सामना फेअरग्राऊंड्स क्रिकेट स्टेडियम, पोनोमा येथे रंगणार आहेत.
हॉकीचा थरार 12 ते 29 जुलैला
हिंदुस्थानला ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक (8) सुवर्णपदक मिळवणारा खेळ म्हणजे हॉकी. कार्सन फील्ड येथे पुरुष आणि महिला हॉकी सामने होणार आहेत.
नेमबाजीत अनेक पदकांची आशा
हिंदुस्थानचा पारंपरिक पदक खेळ म्हणजे नेमबाजी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने नेमबाजीमधूनच तीन पदके मिळवली होती. 15 जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा लाँग बीच टार्गेट शूटिंग हॉल येथे खेळविली जाईल.
अॅथलेटिक्समध्ये नीरज आधारस्तंभ
15 ते 24 जुलैदरम्यान अॅथलेटिक्स स्पर्धा खेळविल्या जाणार आहे. यात नीरज चोप्रासारखा सुवर्णविजेता खेळाडू पुन्हा एकदा भालाफेक करेल. यंदा अॅथलेटिक्स स्पर्धा पहिल्या आठवडय़ात होणार असून ती एल.ए. मेमोरियल कोलिसियम येथे पार पडेल.
कुस्ती (24 ते 30 जुलै)
2008 पासून हिंदुस्थानची सर्वाधिक पदक मिळवणारी स्पर्धा म्हणजे कुस्ती. एल.ए. कन्वेन्शन सेंटर हॉल 2 मध्ये ही स्पर्धा रंगेल.
बॅडमिंटन (15 ते 24 जुलै)
पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्त्विक-चिराग जोडीसारख्या स्टार्सकडून पदकांची अपेक्षा. गेलेन सेंटर येथे सामने खेळवले जातील. टेबल टेनिस, टेनिस, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग, स्क्वॉश आणि तिरंदाजी या खेळांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंकडून पदकांची आशा आहे.