बॉक्सिंग, ब्रिजमध्ये सुवर्णपदक, आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची ऐतिहासिक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने शनिवारी दोन सुवर्ण व एक रौप्य व एक कास्य अशी चार पदकांची कमाई करीत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये अमित पांघलने, तर ब्रिजमध्ये (पत्ते) प्रणब बर्धन (60) आणि शिबनाथ सरकार (56) या जोडीने पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. हिंदुस्थानने 15 सुवर्ण, 24 रौप्य व 30 कास्य अशी एकूण 69 पदकांची कमाई करून ऐतिहासिक कामगिरी केली. याआधी 2010 च्या ग्कांझाऊ आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने एकूण 65 पदकांची कमाई केली होती. तो विक्रम या वेळी मोडला गेला. याचबरोबर आशियाई स्पर्धेत सर्वाधिक 15 सुवर्ण जिंकण्याच्या विक्रमाशीही हिंदुस्थानने यंदा बरोबरी केली. याआधी 1951 च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने सर्वाधिक 15 सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला होता.

पत्त्यांमध्ये सुवर्ण डाव
ब्रिज (पत्ते) या खेळात प्रणब बर्धन (60 वर्षे) आणि शिबनाथ सरकार (56) या हिंदुस्थानी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकून दिले. प्रणब-शिबनाथ जोडीने सुवर्णपदकाच्या डावात 384 गुणांसह बाजी मारली. लिक्सिन यांग व गांग चेन या चिनी जोडीला 378 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हेंकी लासुट व फ्रेडी इडी मोनोप्पा या इंडोनेशियाच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

स्क्वॉशमध्ये महिला संघाला रौप्य
हिंदुस्थानच्या महिला स्क्वॉश संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या वेळी हिंदुस्थानला फायनलमध्ये हाँगकाँगच्या संघाकडून 0-2 फरकाने पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानी संघामध्ये जोशना चिनप्पा, दीपिका पल्लीकल, सुनन्या कुरुकिल्ला आणि तन्वी खन्ना या चौकडीचा समावेश होता. हिंदुस्थानला हाँगकाँगविरुद्ध तीन दिवसांत दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानी संघाने उपांत्य लढतीत मलेशियाचा 2-1 असा पराभव केला होता. यंदाच्या आशियाई स्पर्धेत स्क्वॉशमध्ये हिंदुस्थानने 4 पदके जिंकली. यात महिला संघाचे रौप्य, पुरुष संघाचे कांस्य आणि तीन वैयक्तिक कांस्यपदकांचा समावेश आहे.

अमितने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरविले
यंदाच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अमित पांघल हा हिंदुस्थानचा एकमेव बॉक्सर ठरला. हरयाणाच्या या बॉक्सरने अंतिम लढतीत रियो ऑलिम्पिक चॅम्पियन उझबेकिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा 3-2 असा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

जागतिक क्रमवारी आणि अनुभवामध्ये हसनबॉय हा अमितपेक्षा कित्येक पटीने सरस होता. मात्र आशियाई स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या अमितने बचाव आणि आक्रमणाचा खुबीने वापर करून हसनबॉयला निष्प्रभ केले. पहिल्या डावात हसनबॉय अमितवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अमितने बचावात्मक पवित्रा घेतला. त्यामुळे हसनबॉयला गुणांची कमाई करता आली नाही. दुसऱया डावात अमितचा आक्रमक पवित्रा पाहून हसनबॉय दडपणाखाली आला. याचाच फायदा घेत अमितने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तिसऱ्या सत्रात बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत अमितने सामन्यात बाजी मारत सुवर्ण जिंकले.

पाकिस्तानला हरवून हिंदुस्थान हॉकी संघाला कांस्य
हिंदुस्थानच्या हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 गोलफरकाने हरवून आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकले. 2014 मधील सुवर्णपदक विजेत्या हिंदुस्थानला यंदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे तिसरे कास्यपदक होय. कांस्यपदकाच्या लढतीत हिंदुस्थानकडून आकाशदीप सिंहने तिसऱया, तर हरमनप्रीत सिंहने 50 व्या मिनिटाला गोल केला. पाकिस्तानकडून मोहम्मद अतीकने 52 मिनिटाला एकमेव गोल केला. मागील आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारली होती. या वेळी उपांत्य लढतीत हिंदुस्थानला मलेशियाकडून, तर पाकिस्तानला जपानकडून हार पत्करावी लागली होती.