
सामना ऑनलाईन । सिडनी
हिंदुस्थानी क्रिकेट संघाला कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया दौऱयावर अद्याप एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी विराट कोहलीची सेना चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडीवर आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीस उद्या जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हिंदुस्थानने ही सिडनी कसोटी जिंकली तर तब्बल 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘टीम इंडिया’चा पहिला कसोटी मालिका विजय असणार आहे. त्यामुळे तमाम हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांची अखेरच्या कसोटी सामन्याबद्दलची उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.
11 दौरे, तीनदा बरोबरी, 8 मालिका गमावल्या
हिंदुस्थानचा क्रिकेट संघ 1947-48 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेला. आतापर्यंत हिंदुस्थानने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात 1980-81, 1985-86 व 2003-04 या तीन वेळा हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला होता, मात्र उर्वरित आठ मालिकांत पराभूत होऊनच हिंदुस्थानी संघ मायदेशी परतला. मात्र यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच स्तरावर सरस खेळ केला. त्यामुळे यावेळी हिंदुस्थानला ऑस्ट्रेलिया दौऱयावर
इतिहास घडविण्याची संधी असेल.
– ‘टीम इंडिया’ला एकीकडे ऐतिहासिक मालिकाविजय खुणावत असताना दुसरीकडे दुखापतीचे ग्रहण लागले आहे. सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पायाच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत खेळणार नाही. याचबरोबर सिडनीची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असेल असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र हिंदुस्थानचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अद्याप फिट नसल्याचे वृत्त आहे. रोहित शर्माला कन्यारत्न झाल्याने तोही चौथी कसोटी सोडून मायदेशी परतला आहे. अश्विनसह फॉर्ममध्ये नसलेल्या लोकेश राहुललाही 13 खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
























































