
माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकीर्दीत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची होईल, असा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यात सपशेल अपयश आले आहे. अर्थव्यवस्थेत जगात हिंदुस्थान कितव्या क्रमांकावर जाईल हे भविष्यात स्पष्ट होईल, परंतु सध्या हिंदुस्थान जगातील सर्वाधिक महागाईच्या देशात हिंदुस्थान तिसरा देश ठरला आहे. बँक ऑफ बडोदाच्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक महागाईत रशिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहेत. तर हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. रशियाचा महागाई दर 7.5 टक्के, दक्षिण आफ्रिकेचा महागाई दर 5.9 टक्के तर हिंदुस्थानचा नोव्हेंबरमधील महागाई दर 5.6 टक्के होता. ऑस्ट्रेलियात हा दर 5.4 टक्के, सिंगापूरमध्ये 4.7 टक्के, ब्राझीलमध्ये 4.7 टक्के दर आहे.
महागाईचा भडका
हिंदुस्थानात नोव्हेंबरमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून डिसेंबरमध्येही महागाईपासून दिलासा मिळणार नसून महागाईचा भडका पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
प्रत्येकावर 1.40 लाख कर्ज
पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणाऱया मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे हिंदुस्थानवर 205 लाख कोटी रुपयांया कर्जाचा बोजा आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीवर 1.40 लाख रुपयांचे कर्ज आहे.
कृषी श्रमिकांसाठीची किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये वाढून 7.37 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्रामीण श्रमिकांसाठी हा दर 7.13 टक्के राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये कृषी श्रमिकांचा किरकोळ महागाई दर 7.08 टक्के आणि ग्रामीण श्रमिकांचा किरकोळ महागाई दर 6.92 टक्के होता.

























































