तोट्यातून सावरण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांचे सरकारला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या अनियमित वेळापत्रकामुळे तोट्यात भरडलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. देशातील दहापेक्षा अधिक राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनबाबत एकवाक्यता नाही. केंद्राचे एक धोरण आणि स्थानिक प्रशासनाचे दुसरेच धोरण असते. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या चार महिन्यांत झालेल्या तोट्यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. सरकारने याकामी समन्वय साधून किरकोळ विक्रेत्यांना तारणारे धोरण आखावे, असे साकडे रिटेलर्स असोसिएशनने केंद्र सरकारला घातले आहे.

पंजाब, हरयाणा, केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या 10 पेक्षा अधिक राज्यांमध्ये शनिवारी आणि रविवारीही म्हणजेच किकेण्डला लॉकडाऊन केला जात आहे. त्याचा ग्राहकांना तसेच रिटेल इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या एकूण व्यवसायापैकी 45 टक्क्यांहून अधिक व्यवसाय हा शनिवारी आणि रविवारी होतो. मात्र अनेक राज्यांनी विकेण्ड लॉकडाऊन ठेवल्याने आमचा व्यवसाय तोटय़ातच जात आहे. राज्ये आणि केंद्र सरकारच्या असमन्वयामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या चार महिन्यांत झालेल्या तोटय़ातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे, असे म्हणणे रिटेलर्स असोसिएशनने मांडले आहे.