
देशात कोरोनाचे रुग्ण मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्वाधिक असतील. त्यानंतर मात्र रुग्णांची संख्या कमी होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. ज्या राज्यांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केलीय, त्या राज्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी होईल, असेही सांगण्यात आले आहे.
देशासाठी पुढचा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढणार आहे. श्वसनाच्या संसर्गाची लक्षणे असलेल्या सर्वांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत, असे संबंधित अधिकाऱयाने सांगितले. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱया आणि विलगीकरण कक्षात जाणाऱयांची संख्याही दिवसागणिक वाढेल. राजस्थान, बिहार, पंजाब या राज्यांनी सर्वात आधी लॉकडाऊन केल्याने तिथे कोरोनाचा मोठा संसर्ग रोखण्यात आला आहे, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 12 हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे 3.6 लाख जणांना आयसोलेशनमध्ये किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
समूह संसर्ग टाळता येईल, पण…
येत्या काळात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सरकारपुढे केवळ समूह संसर्ग रोखण्याचेच नव्हे तर विखुरलेल्या रुग्णांकडून होणारा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असेल. समूह संसर्गाला आळा घालता येईल, मात्र विखुरलेल्या संसर्गाला अटकाव करणे कठीण आहे, असे संबंधित अधिकाऱयाने सांगितले.

























































