
कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत केले जात असतानाच देशात मात्र कोरोना कमजोर होत असल्याचे समोर आहे. कोरोनाची देशातील आर व्हॅल्यू 1 च्या खाली आहे. कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतोय हे दर्शविणारी ही आर व्हॅल्यू घसरली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील कोरोना आर व्हॅल्यू 0.92 टक्क्यांवर आली आहे.
ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू 1.17 इतकी होती. तर 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरदरम्यान ही आर-व्हॅल्यू 1.11 वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही 1 च्या खाली आली आहे. 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही 0.86 होती. यामुळे राज्याराज्यांत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा प्रभाव हा या आर व्हॅल्यूवर दिसत असून कोरोनाला रोखण्यात यश येत असल्याचे हे चित्र आहे.
महाराष्ट्र-केरळलाही दिलासा
देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी आहे. याआधी या दोन राज्यांत मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. मात्र आता ही राज्य सावरत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईची आर व्हॅल्यू 1.09
चेन्नईच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसच्या सीताभारा सिन्हा म्हणाल्या की, चांगली बातमी अशी आहे की हिंदुस्थानची आर-व्हॅल्यू केरळ आणि महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. या दोन्ही राज्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सिन्हा या आर-व्हॅल्यूची गणना करणाऱया संशोधकांच्या टीमचं नेतृत्व करत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईची आर-व्हॅल्यू 1.09, चेन्नईची आर-व्हॅल्यू 1.11, कोलकाता 1.04, बेंगळुरूची आर-व्हॅल्यू 1.06 इतकी आहे.
































































