देशाला सुशिक्षित पंतप्रधानांची गरज, अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET-UG) २०२६ मधील गोंधळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शुक्रवारी देशभरातील अनेक CUET केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे परीक्षांना उशीर झाल्याच्या बातम्या आल्यानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

X वर एक पोस्ट करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, “देशाला एका सुशिक्षित पंतप्रधानांची गरज आहे.” उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधणाऱ्या आप नेत्या आतिशी यांच्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी एका सोशल मीडिया युजरचा मेसेज रिपोस्ट केला होता. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, वाराणसीच्या लोहता येथील शीतला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सर्व्हरशी संबंधित समस्यांमुळे विद्यार्थी वेळेवर परीक्षा सुरू करू शकले नाहीत. ही पोस्ट शेअर करताना आतिशी यांनी लिहिले की, “वाराणसीतील CUET परीक्षा केंद्राची दृश्ये. सर्व्हर काम करत नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे.” या सोशल मीडिया पोस्टनुसार, परीक्षा सकाळी ९ ते १० या वेळेत होणार होती, परंतु केंद्रावरील तांत्रिक अडचणींमुळे सकाळी १०:५० पर्यंतही ती सुरू होऊ शकली नव्हती.