हिंदुस्थान ऐकत नाही, 25 टक्केपेक्षा जास्त टॅरिफ लावणार, नवा टॅक्स लागू होण्याआधीच ‘डोलांड’ यांनी दम भरला

हिंदुस्थान हा देश व्यापारासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळेच मी त्यांच्यावर 25 टक्के टॅरिफ लावले आहे आणि पुढच्या 24 तासांत त्यात जबरदस्त वाढ करणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

हिंदुस्थानमधील आयात शुल्क जगातील इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे, असे सांगत, अलीकडेच ट्रम्प यांनी हिंदुस्थानी मालावर 25 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. तसेच रशियाशी व्यापार करत असल्याबद्दल दंडही ठोठावला आहे. या वाढीव टॅरिफची अंमलबजावणी 7 ऑगस्टपासून होणार आहे. त्याआधीच ट्रम्प यांनी त्यात आणखी वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.

ही पोकळ धमकी – रशिया

अमेरिकेची धमकी पोकळ आहे. आर्थिक संबंध कोणाशी असावेत हे ठरविण्याचा प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला अधिकार आहे. रशियाशी व्यापार करू नका असे सांगणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. आम्हाला ‘ब्रिक्स’ देशांचा पाठिंबा आहे. कोणतेही निर्बंध किंवा टॅरिफ वॉर काळाची पावले उटली फिरवू शकत नाही, असे रशियाने अमेरिकेला ठणकावले आहे.

व्यापाराच्या दृष्टीने हिंदुस्थान कधीच चांगला सहकारी नव्हता. ते आम्हाला अनेक गोष्टी निर्यात करतात, पण आम्ही त्यांच्याशी फार व्यापार करत नाही. 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही रशियाकडून त्यांची तेल खरेदी सुरूच आहे. हिंदुस्थान मोठा नफाही कमवत आहे. त्यामुळेच पुढच्या 24 तासांत मी टॅरिफ वाढवणार आहे.

…म्हणून ट्रेड डील फसलीय!

हिंदुस्थानशी होऊ घातलेला व्यापार करार कुठे अडकला आहे, असे विचारले असता ट्रम्प यांनी हिंदुस्थानातील आयात शुल्काकडे बोट दाखवले. मी तर म्हणेन की, आता त्यांनी आमच्या मालावरील टॅरिफ शून्यावर आणले तरी फारसा फरक पडणार नाही. कारण ते अजूनही रशियाकडून तेल घेत आहेत. युद्धाच्या मशीनला वंगण पुरवत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.