सिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रतिष्ठेची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू व किदाम्बी श्रीकांत हे कामगिरीत सुधारणा करून पुन्हा एकदा जेतेपदाच्या इराद्याने कोर्टवर उतरतील. पोटदुखीच्या त्रासामुळे अनुभवी सायना नेहवाल या देशातील अव्वल खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्याने हिंदुस्थानची मदार सिंधू आणि श्रीकांतवरच असेल. गतवर्षी डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनलचा किताब जिंकणाऱया सिंधूला या वेळी जेतेपदाची संधी असेल.

कारण अव्वल मानांकित आणि गत ऑल इंडिया चॅम्पियन चेन युफेई हिने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने आणि जपानी खेळाडूंच्या गैरहजेरीत सिंधूला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र नव्या मोसमात सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली होती. शिवाय प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत तर ती सलामीलाच गारद झाली होती. त्यामुळे सिंधूला नव्या जोमाने या स्पर्धेत खेळावे लागणार आहे. तिची सलामी आपलीच देशभगिनी मुग्धा आग्रे हिच्याशी होणार असून उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ आठव्या मानांकित डेन्मार्कच्या मिया ब्लिकफेल्ट हिच्याशी पडणार आहे.

तृतीय मानांकित किदाम्बी श्रीकांतसाठीही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. कारण मागील 17 महिन्यांपासून त्याला अद्यापि एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. गत चॅम्पियन व अव्वल मानांकित चीनच्या शी युकीने स्पर्धेतून माघार घेतल्याने श्रीकांत व डेन्मार्कचा विक्टर एक्सलसन यांना जेतेपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहे. 26 वर्षीय श्रीकांत हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेंटविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करेल.