प्रणॉय, प्रियांशूची विजयी सलामी ; लक्ष्य सेनला प्रियांशूने हरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयने चिनी तैपेईच्या टी.एन. चेन चूचा पराभव करून इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. याचबरोबर प्रियांशू राजावतने आपलाच देशसहकारी लक्ष्य सेनवर सनसनाटी विजय मिळवित दुसऱया फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानचा अव्वल आणि स्पर्धेत आठवे मानांकन मिळालेल्या एच. एस. प्रणॉयने चिनी तैपेईच्या टी.एन. चेन चूचा 21-6, 21-19 असा 42 मिनिटांत पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. टी.एन. चेनविरुद्ध आतापर्यंत झालेल्या 13 लढतींतील प्रणॉयचा हा सहावा विजय होय. आता दुसऱया फेरीत प्रणॉयची गाठ आपल्याच देशाच्या प्रियांशू राजावत याच्याशी पडणार आहे. प्रियांशूने माजी विजेत्या लक्ष्य सेनचा चुरशीच्या पहिल्या फेरीत 16-21, 21-16, 21-13 असा पराभव केला. पहिल्या गेम गमाविल्यानंतरही प्रियांशूने जबरदस्त खेळ करीत सव्वा तास रंगलेल्या लढतीत बाजी मारली.