
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अद्यापि जाहीर केलेले नाही. मात्र संभाव्य वेळापत्रक समोर आले असून हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 15 ऑक्टोबरला सामना रंगण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान हिंदुस्थानमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यानचा ‘हाय व्होल्टेज’ सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर व्हावा अशी आयसीसी आणि ‘बीसीसीआय’ची इच्छा आहे, मात्र उभय संघांच्या क्रिकेट बोर्डमध्ये अद्यापि याबाबत सहमती झालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अहमदाबादमध्ये सामना खेळण्यास तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान लढत ही रविवारी होईल. आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे आणि आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर कोणत्याही दिवशी त्याची घोषणा केली जाऊ शकते.
इंग्लंड–न्यूझीलंड लढतीने स्पर्धेचा शंखनाद
इंग्लंड-न्यूझीलंडदरम्यानच्या लढतीने आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा शंखनाद होऊ शकतो. गेल्या वेळी 2019 मध्ये जेव्हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा झाली होती तेव्हा या दोन संघांमध्ये जेतेपदाची लढत रंगली होती. म्हणजेच गेल्या विश्वचषकाचा शेवट जिथे झाला तिथून नवा विश्वचषक सुरू होईल. हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने विश्वचषकातील आपल्या अभियानास प्रारंभ करण्याची शक्यता वाटत आहे.
दक्षिण आफ्रिका विश्वचषक स्पर्धेस पात्र
हिंदुस्थानात होणाऱया यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकूण दहा संघ काwशल्य पणाला लावणार आहेत. यातील आठ संघांनी या स्पर्धेची पात्रता मिळवली असून दक्षिण आफ्रिका हा पात्र ठरणारा आठवा देश ठरला आहे. जुलै 2020 ते मे 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतक्त्यामध्ये आठव्या स्थानी राहिल्याने विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून स्पर्धेचे तिकीट बुक करणार आहे. यजमान हिंदुस्थानसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश व दक्षिण आफ्रिका या आठ संघांनी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता सिद्ध केली आहे.

























































