पाकिस्तानच्या ‘डीएनए‘मध्येच दहशतवाद,कश्मीर मुद्दय़ावर हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

322

जम्मू-कश्मीर मुद्दय़ावर हिंदुस्थानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक चणचणीत सापडलेल्या पाकिस्तानच्या ‘डीएनए’मध्येच दहशतवाद भरला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत हिंदुस्थानने पाकिस्तानवर तोफ डागली.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत सहभागी झालेल्या हिंदुस्थानी शिष्टमंडळाच्या प्रमुख अनन्या अग्रवाल यांनी पुढे बोलताना सांगितले, ‘पाकिस्तानच्या चुकीच्या व्यवहाराचा फटका येथील अर्थव्यवस्थेला बसला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कट्टरपंथी आणि दहशतवादात अडकली आहे. त्या पुढे म्हणाल्या,‘ 2018 मध्ये कमकुवत राज्यांच्या सूचीत पाकिस्तान 14 व्या स्थानावर होते. हा देश म्हणजे कट्टरतावाद आणि आतंकवाद यांचे मूळ आहे.’

संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा गैरवापर

पाकिस्तानच्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केला आहे. या व्यासपीठावरून अणुयुद्धाचा प्रचारच पाकिस्तानने केला. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान इमरान खान यांनी अणुयुद्ध झाल्यास त्याचे परिणाम शेजारील देशाच्या सीमेच्या पलिकडे जातील, असे म्हटल्याचे अनन्या अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानला बदनाम करण्याचा डाव

पाकिस्तानी नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट असताना त्यावर नियंत्रण मिळविण्याऐवजी पाकिस्तान सतत हिंदुस्थानला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असतो, ही बाबही अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिली.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या