हिंदुस्थानची लोकसंख्या 136 कोटींवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. लोकसंख्या तब्बल 136 कोटींवर गेली आहे. 2010 ते 2019 या नऊ वर्षांत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 1.2 असून हा चीनपेक्षाही जास्त आहे. दरम्यान चीनची लोकसंख्या 142 कोटींवर गेली आहे. जगाची लोकसंख्या 771.50 कोटी झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्येबाबत अहवाल जाहीर केला त्यात हिंदुस्थान हा सर्वाधिक लोकसंख्येचा दुसरा देश आहे.

सरासरी आयुर्मान दर 69 वर्षे
हिंदुस्थानातील नागरिकाचे सरासरी आयुर्मान 1969 मध्ये 47 वर्षे होते ते 1994 साली 60 तर 2019 मध्ये 69 वर्षे झाले आहे. याचे कारण म्हणजे देशातील वाढत्या आरोग्य सुविधा हे आहे. जगाच्या सरासरी आयुर्मानाचा दर 72 वर्षे इतका आहे.

माता मृत्यूदर चिंताजनक
संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीनुसार हिंदुस्थानातील मातांचा प्रसूतीकाळातील मृत्यूदर 1994 ला 1 लाखामागे 488 होता तो 2015 मध्ये प्रतिलाख 174 मृत्यू इतका खाली आला आहे ही समाधानकारक बाब असली तरी काहीशी चिंताजनक आहे.

अशी वाढली देशाची लोकसंख्या
1969 – 54.15 कोटी
1994 – 94.22 कोटी
2019 – 136 कोटी

तरुणांचा देश
1 ते 14 वर्षे – 27 टक्के
10 ते 24 वर्षे – 27 टक्के
15 ते 64 वर्षे – 67 टक्के
65 वर्षांवरील – 6 टक्के

जगातील 30 टक्के लोकसंख्या दोन देशांत
2019 मध्ये जगाची लोकसंख्या 771.50 कोटींवर आहे. त्यात हिंदुस्थानची लोकसंख्या 136 कोटी तर चीनची 142 कोटींवर गेली आहे. जगातील 30 टक्क्यांपेक्षा जास्त लोक या दोन देशांत आहेत.