दहशतवादाला खतपाणी घालण्यापेक्षा मरणासन्न अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या! UNHRC मध्ये हिंदुस्थानने पाकड्यांना फटकारले

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. तसेच पाकिस्तानातील वास्तव स्थितीचीही त्यांना जाणीव करून दिली. दहशतवादाला पोसणे आणि त्याला खतपाणी घालणे हेच पाकिस्तानचे धोरण आहे. UNHRC मधील तरुण भारतीय अधिकारी क्षितिज त्यागी यांनी याच मुद्द्यावर पाकिस्तानला झोडपले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालण्यापासून आणि आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करण्यापासून वेळ मिळाला तर त्यांनी आपल्या मरणासन्न अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे, असा परखड सल्लाही त्यांनी दिला आहे.

पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तुनख्वा येथे आपल्याच असहाय्य आणि निष्पाप नागरिकांवर केलेल्या बॉम्बस्फोटाकडे हिंदुस्थानने जगाचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तानच्या या कृत्याकडे हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो लढाऊ विमानांचा वापर करून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करत निरपराधांची हत्या करतो.

पाकिस्तानी सैन्याने २२ सप्टेंबरच्या रात्री खैबर पख्तुनख्वा येथील तिरह खोऱ्यात पाकिस्तानने केलेल्या बॉम्बहल्ल्यात महिला आणि मुलांसह 30 लोकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तुनख्वा येथील स्थानिक प्रतिनिधींनी याला “जेट बॉम्बस्फोट” म्हटले आहे. चिखलात माखलेल्या मृत मुलांचे आणि खाटांवर मृतदेहांच्या रांगा असलेले फोटो हृदयद्रावक आहेत. याकडे हिंदुस्थानने जगाचे लक्ष वेधले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील (UNHRC) जिनेव्हा येथील हिंदुस्थानच्या स्थायी मिशनचे सल्लागार क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याचा आरोप केला. क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानचे दुष्कृत्ये जगासमोर उघड केली. ते म्हणाले की, आमच्या भूभागावर कब्जा करण्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग सोडावा आणि जर त्यांच्याकडे दहशतवाद पोसण्यापासून, स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी ठरवलेल्यांनी आश्रय देण्यापासून वेळ मिळालाच तर त्यांनी त्यांची मरणासन्न अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या या बैठकीत, क्षितिज त्यागी यांनी पुलवामा, उरी, पठाणकोट आणि मुंबईसह मागील हल्ल्यांचा तसेच पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले, त्यांनी यापूर्वी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिल्याचे निदर्शनास आणून दिले. हिंदुस्थानने पाकिस्तानवर हिंदुस्थानप्रती असंवेदनशील असल्याचा आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद आणि इस्लामिक सहकार्य संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा नियमितपणे गैरवापर करण्याचा आरोप केला. त्यागी यांनी आपल्या नागरिकांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हिंदुस्थानच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.