
हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच बंगालच्या उपसागरात हिंदुस्थान आणि रशियाच्या संयुक्त युद्धसरावाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात हा युद्ध अभ्यास दोन दिवस सुरू राहणार आहे. विविध आव्हानांचा सामना करणे आणि कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याच्या हेतूने हा युद्धसराव होत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नौसेनेच्या क्षमता वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संयुक्त युद्ध सरावामुळे चीनला धडकी भरली आहे.
बंगालच्या उपसागरात दोन्ही देशांच्या नौसेनेकडून सुरू असलेल्या या युद्धसरावाला ‘इंद्र 2020’ असे नाव देण्यात आले आहे. या युद्धसरावात विविध युद्धतंत्रांचा सराव करण्यात आल्याची माहिती हिंदुस्थानी नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवई यांनी दिली. त्यात संचलन, गोळीबाराचा सराव, हवाई करवाई, हेलिकॉप्टर वापराचे तंत्र यांचा सराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानी नौदलाचे गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर रणविजय, स्वदेशी फ्रिगेट सह्याद्री, फ्लीट टॅकर शक्ती आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर युद्धसरावात सहभागी झाले आहेत. तर रशियाकडून डिस्ट्रॉयर अॅडमिरल विनोग्रादॉव, डिस्ट्रॉयर अॅडमिरल ट्रिब्यूट्स आणि फ्लीट टँकर बोरिस बुटोमा सहभागी झाले आहेत.
चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा युद्धसराव महत्त्वाचा मानला जात आहे. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात हिंदुस्थानने या युद्धसरावाद्वारे चीनला इशारा दिला आहे. तसेच हिंदुस्थानच्या नौसेनेच्या क्षमतेने चीनलाही धडकी भरली आहे. हिंदी महासागरातील मालदीवजवळील मलक्का खाडीचे क्षेत्र चीनसाठी खूप महत्त्वाचे आहे. हा मार्ग बंद झाल्यास समुद्रीमार्गे सुरू असलेल्या चीनचा व्यापार ठप्प होणार आहे. त्यामुळे या युद्धसरावाला महत्त्व आले आहे. जुलै महिन्यात हिंदुस्थानी नौसेनेने अण्वस्त्रांची क्षमता असलेल्या अमेरिकेच्या एसएस निमित्जसह अंदमान-निकोबार बेटांजवळ सराव केला होता. निमित्ज हे जगातील सर्वात बलाढ्य लढाऊ जहाज आहे. तसेच जून महिन्यात नौदलाने जपानसोबतही युद्धसराव केला होता. या युद्धसरावाद्वारे हिंदुस्थानी नौलदाच्या क्षमतांमुळे चीनलाही धडकी भरली आहे.
























































