आज कंकणाकृती सूर्यग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवार, 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. उत्तर हिंदुस्थानातून हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर उर्वरित हिंदुस्थानातून खंडग्रास ग्रहण दिसेल. हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहण सुटेल तर दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी खंडग्रास ग्रहण सुटेल.

महाभारत युद्ध झाले, त्या हरयाणामधील कुरुक्षेत्राकरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना हिंदुस्थानात सूर्याचा 98.6 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 टक्के भाग, मुंबईमध्ये 62 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाची राजस्थान, पंजाब, हरयाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशांतून कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. उर्वरित हिंदुस्थानातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.

मुंबईतून खंडग्रास दर्शन

21 जून रोजी सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहण मध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे 70 टक्के ग्रासित दिसेल. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतु, मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल, अशी आशा खगोलप्रेमींना वाटत आहे. खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा यानंतरचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण हिंदुस्थानातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशिरा म्हणजे 3 नोव्हेंबर 2404 रोजी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.