टीम इंडियाचा मालिका विजयाचा निर्धार! दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी झुंजणार

हिंदुस्थान-दक्षिण आप्रैका दरम्यानचा लखनौमधील चौथा टी-20 सामना धुक्यात हरवून गेल्याने आता मालिकेचा निकाल अखेरच्या पाचव्या सामन्यात होणार आहे. मालिकेत 2-1 फरकाने आघाडीवर असलेली टीम इंडिया शुक्रवारी अहमदाबादमध्ये होणार्या या निर्णायक सामन्यात मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. दुसरीकडे दक्षिण आप्रैकेचा संघही मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसेल.

लखनौमध्ये बुधवारी दाट धुक्यामुळे चौथा टी-20 सामना रद्द झाल्याने उभय संघांसाठीही मालिकेतील रंगत अद्याप जिवंत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मात्र हवामानाचा कोणताही अडथळा येण्याची शक्यता नाही. त्यामुळे संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित राहणार आहे. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी हा सामना फॉर्ममध्ये परतण्यासाठी आणखी एक संधी असेल. या मालिकेनंतर हिंदुस्थानी खेळाडूंना जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळणार असून, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळले जाणार आहेत. अशा स्थितीत आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमारसारख्या फलंदाजांसाठी धावा मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.