
सामना प्रतिनिधी । श्रीनगर
कश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर समझोता एक्सप्रेस रद्द केल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला आणखी एक झटका देत दिल्ली परिवहन निगमची (डीटीसी) सुरू असलेली दिल्ली-लाहोर बससेवाही सोमवारी रद्द केली. 370 कलम रद्द केल्यानंतरच ही मैत्री बससेवा स्थगित करण्याची घोषणा पाकिस्तानच्या एका वरिष्ठ मंत्र्याने केली होती. त्याला उत्तर म्हणूनच हिंदुस्थानने ही बससेवा रद्द केली.
डीटीसीची एक बस सोमवारी सकाळी 6 वाजता लाहोरला रवाना होणार होती. पण पाकिस्तानच्या विरोधामुळे ती रद्द करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे, असे दिल्ली परिवहन निगमच्या अधिकार्याने स्पष्ट केले. लाहोरसाठी शेवटची दिल्ली-लाहोर बस शनिवारी सकाळी दिल्लीहून रवाना झाली होती. त्यात केवळ दोनच प्रवासी होते. ती परत येताना बसमध्ये 19 प्रवासी होते.
मुळात ही बससेवा फेब्रुवारी 1999 मध्ये सुरू झाली होती. मात्र 2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2003मध्ये ही बससेवा पुन्हा सुरू झाली. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकनंतर उभय देशांतील संबंध बिघडल्यानंतरही ही बससेवा सुरू होती. पण पाकिस्तानच्या हेकेखोरपणामुळे आता ती पुन्हा रद्द करण्यात आली आहे.
























































